BMC Ward Reservation: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2025) आरक्षणाची सोडत अखेर मंगळवारी जाहीर करण्यात आली. बांद्र्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 11 वाजता मुंबई महानगरपालिकेच्यावतीने या सोडतीची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेदरम्यान अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), इतर मागासवर्ग (OBC) तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. मुंबईतील एकूण 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जातींसाठी एकूण 15 वॉर्ड राखीव असून, त्यापैकी 8 वॉर्ड अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी आहेत. तसेच अनुसूचित जमातींसाठी 2 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले असून, त्यापैकी एक वॉर्ड महिला उमेदवारासाठी राखीव असेल.
दरम्यान, ओबीसी प्रवर्गासाठी 61 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले असून, त्यापैकी 31 वॉर्ड ओबीसी महिला उमेदवारांसाठी असतील. तर सर्वसाधारण प्रवर्गात 149 वॉर्ड असतील, यामध्ये 74 वॉर्ड सर्वसाधारण महिला उमेदवारांसाठी राखीव राहतील. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की, 14 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आरक्षणाच्या प्रारूपावर नागरिक हरकती आणि सूचना सादर करू शकतील. प्राप्त हरकतींवर विचार करून अंतिम आरक्षण अधिसूचना जाहीर केली जाईल.
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं
एकूण प्रभागसंख्या: 227
महिलांसाठी राखीव: 114
अनुसूचित जाती: 15 (महिला 8)
अनुसूचित जमाती: 2 (महिला 1)
ओबीसी: 61 (महिला 31)
सर्वसाधारण वॉर्ड: 149 (महिला 74)
अनुसूचित जमातींसाठी राखीव वॉर्ड:
प्रभाग क्रमांक – 53, 121
अनुसूचित जातींसाठी राखीव वॉर्ड (महिला आरक्षणासह):
26, 93, 151, 186, 146, 152, 155, 147, 189, 118, 183, 215, 141, 133, 140
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ही सोडत प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी ठरली असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता उमेदवार निवड आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे.


