Dharmendra Health Update: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांना त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पूर्णविराम दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत त्यांनी स्पष्ट केले की धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत आहेत आणि बरे होण्याच्या प्रक्रियेत आहेत. हेमा मालिनी म्हणाल्या, “जे घडत आहे ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल उपचार घेत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करा.”
दरम्यान, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल हिनेही तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना आश्वस्त केले आहे. ती म्हणाली, “माझे वडील स्थिर आहेत आणि बरे होत आहेत. कृपया त्यांच्या आरोग्याबद्दल कोणत्याही अटकळांवर विश्वास ठेवू नका. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार.”
दरम्यान, ८९ वर्षीय धर्मेंद्र सध्या मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. सोमवारी सकाळी त्यांना अधिक वैद्यकीय देखरेखीसाठी अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्या भेटीसाठी सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी, ईशा देओल यांसह सलमान खान आणि शाहरुख खान हेही रुग्णालयात पोहोचले होते. ज्येष्ठ अभिनेत्याच्या आरोग्याबाबत चाहत्यांकडून सोशल मीडियावर सतत प्रार्थना व्यक्त केल्या जात असून, कुटुंबीयांनी त्यांच्या लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे.


