Indapur Election: इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेचं तापले आहे. या निवडणुकीत भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट)वर ताशेरे ओढले आहेत. इंदापूरमध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या वृत्तीविरोधात उभे आहोत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला आम्ही मान्यता देऊ शकत नाही, असा स्पष्ट दावा पाटील यांनी केला.
अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्ष जुना असला तरी, नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो आणखी चिघळलेला पाहायला मिळत आहे. इंदापूरमध्ये उमेदवार नसतानाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझ्यावर टीका का केली? आमची चूक नेमकी काय? असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.
अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांचे प्रत्युत्तर
इंदापूरमधील सभेत अजित पवारांनी विकासकामांवरून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्ला चढवला होता. यावर पलटवार करताना पाटील म्हणाले, अजित पवारांनी टीका केली, पण यावेळी त्यांनाच पराभव पत्करावा लागेल. जनता कोणाच्या कामावर खूश आहे, हे मतदानातून समोर येईल.
अजित पवारांनी काय म्हटले होते?
अजित पवारांनी आपल्या भाषणात भरणे यांच्यापासून ते टाऊन हॉलच्या अपुऱ्या कामांपर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यांनी म्हटले होते की, काम करण्यासाठी ताकद लागते, फक्त दिखावा करून काम होत नाही. इंदापूरमध्ये अनेक प्रकल्प 17 वर्षांपासून अपूर्ण आहेत. दरम्यान, इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत आता संघर्ष चुरशीचा होणार हे निश्चित मानले जात आहे. पाटील आणि पवार यांच्यातील वाद पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, याचा प्रभाव मतदानावर किती पडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


