T20 World Cup 2026 : यंदाच्या T-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी क्रिकेट जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाने भारतात खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याने अखेर या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्थळ बदलण्याची बांगलादेशची विनंती फेटाळून लावल्यानंतर हा टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
७ फेब्रुवारी २०२६ पासून भारत आणि श्रीलंकेच्या यजमानपदाखाली T-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारतात येण्यास सातत्याने विरोध दर्शवला होता. ‘मुस्तफिजूर रहमान’ला आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघातून वगळल्याच्या प्रकरणावरून बांगलादेश नाराज होता. त्यांनी आयसीसीकडे त्यांचे सामने भारताबाहेर हलवण्याची विनंती केली होती, जी आयसीसीने स्पष्टपणे फेटाळून लावली.
आयसीसीचा अल्टिमेटम आणि बांगलादेशचा पवित्रा
आयसीसीने २१ जानेवारी रोजी बांगलादेशला अंतिम इशारा दिला होता. “भारतात जाण्यास सहमती द्या किंवा स्पर्धेतून बाहेर पडण्यास तयार राहा,” यासाठी २२ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी खेळाडूंशी चर्चा करून आयसीसीची भूमिका अमान्य असल्याचे जाहीर केले.
BCB कडून आयसीसीवर टीका
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी या निर्णयासाठी आयसीसी आणि बीसीसीआयला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले की, “आम्ही भारतात खेळणार नाही या निर्णयावर ठाम आहोत. आयसीसीने बांगलादेशच्या २० कोटी क्रिकेट प्रेमींना वेगळे केले आहे. क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये जात असताना बांगलादेशसारखा देश बाहेर राहणे हे आयसीसीचे अपयश आहे.”
नव्या संघाला मिळणार संधी
T-20 विश्वचषकासाठी बांगलादेशची गणना गट ‘क’ (Group C) मध्ये करण्यात आली होती. या गटात इटली, वेस्ट इंडिज, नेपाळ आणि इंग्लंड यांसारख्या संघांचा समावेश आहे. आता बांगलादेशने बहिष्कार टाकल्यामुळे त्यांच्या जागी एका नवीन संघाला विश्वचषकाचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत आता २० संघांऐवजी बांगलादेशची जागा कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


