Salary Cut: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) खेळाडूंच्या वार्षिक केंद्रीय करार प्रणालीमध्ये (Central Contract System) मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. या नवीन प्रस्तावामुळे भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू, विराट कोहली आणि रोहित शर्मा, यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ प्रतिष्ठेवर नव्हे, तर ‘सध्याची कामगिरी’ आणि ‘सहभाग’ यावर आधारित पगार देण्याचे धोरण बोर्ड आखत आहे.
आता चार ऐवजी केवळ तीनच श्रेणी
बीसीसीआय सध्याच्या A+, A, B आणि C अशा चार श्रेणींच्या रचनेत बदल करून ती फक्त A, B आणि C अशा तीन श्रेणींमध्ये मर्यादित करण्याची योजना आखत आहे.
- A+ श्रेणी रद्द होणार? : सध्याच्या नियमानुसार A+ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ७ कोटी मिळतात. मात्र, नवीन प्रस्तावानुसार ही श्रेणीच काढून टाकली जाऊ शकते.
- निकष काय? : एखादा खेळाडू किती फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) खेळतो आणि संघाच्या भविष्यातील योजनांमध्ये त्याची भूमिका काय आहे, यावर त्याचे ग्रेड ठरवले जाईल.
विराट-रोहित ‘ग्रेड-बी’ मध्ये जाण्याची शक्यता
या बदलाचा सर्वात मोठा परिणाम अनुभवी खेळाडूंवर होईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे आता प्रामुख्याने केवळ एकदिवसीय (ODI) क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. ‘खेळाडूंचा वर्कलोड आणि त्यांचा सध्याचा सहभाग लक्षात घेऊन ही रचना केली आहे. जे खेळाडू तिन्ही फॉरमॅटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांना योग्य मोबदला मिळावा हा यामागचा उद्देश आहे,’ असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जर हे वरिष्ठ खेळाडू केवळ एकाच फॉरमॅटमध्ये खेळले, तर त्यांना ग्रेड-बी मध्ये स्थान मिळू शकते, ज्याचे वार्षिक मानधन सध्या ३ कोटी इतके आहे. म्हणजेच त्यांच्या पगारात निम्म्याहून अधिक कपात होऊ शकते.
तरुण खेळाडूंना मिळणार संधी
बीसीसीआयच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा उदयोन्मुख तरुण खेळाडूंना होणार आहे. केवळ नावाला महत्त्व न देता प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरीला महत्त्व दिले जाणार असल्याने, सातत्य राखणाऱ्या तरुणांना थेट उच्च श्रेणीत स्थान मिळवण्याची संधी उपलब्ध होईल.
पुढील बैठकीत अंतिम निर्णय
बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या (Apex Council) आगामी बैठकीत या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा एक मोठा ‘टर्निंग पॉईंट’ मानला जात आहे, कारण बोर्ड आता भविष्यातील आव्हाने आणि खेळाडूंच्या तंदुरुस्तीला (Fitness) सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


