मुंबई: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या (डब्ल्यूसीएल) दुसऱ्या मोसमाला सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये खेळण्यासाठी भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू दाखल झाले आहेत. या लीगचा हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात २० जुलै रोजी खेळला जाणार असल्याने खळबळ उडाली आहे. ज्यामुळे भारताच्या काही दिग्गज खेळाडूंनी मोठा निर्णय घेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आपली नावे मागे घेतली आहेत.
पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय
भारताचा दिग्गज खेळाडू हरभजन सिंगने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आपले नाव मागे घेतले आहे. हरभजन सिंग गेल्या मोसमाचा भाग होता, पण यावेळी त्याने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. भज्जीच नव्हे तर इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनीही आपली नावे मागे घेतली आहेत. पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यानंतर 7 ते 10 मे दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष झाला होता.
पण या ऑपरेशन सिंदूरच्या अवघ्या 2 महिन्यांनंतर भारताचे दिग्गज खेळाडू पाकिस्तानविरुद्ध असा सामना खेळणार आहेत, जो चाहत्यांना आवडत नाही. सोशल मीडियावर चाहते सातत्याने या सामन्याला विरोध करत आहेत. पाकिस्तानच्या संघात शाहिद आफ्रिदीचाही समावेश आहे, ज्याने पहलगाम हल्ल्यानंतर भारताविरुद्ध गरळ ओकली होती. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघाविरुद्ध सामने खेळू नयेत, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
डब्ल्यूसीएल २०२५ साठी संघ
इंडिया चॅम्पियन्स संघ: युवराज सिंग, शिखर धवन, हरभजनसिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, पीयूष चावला, स्टुअर्ट बिन्नी, वरुण आरोन, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, सिद्धार्थ कौल, गुरकीरत मान.
पाकिस्तान चॅम्पियन : मोहम्मद हफीज, शोएब मलिक, सरफराज अहमद, शरजील खान, वहाब रियाज, आसिफ अली, शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल, आमेर यामीन, सोहेल खान, सोहेल तनवीर.


