खेळात सामन्याचे चित्र कधी पालटेल हे सांगता येत नाही. टी २० विश्वचषक स्पर्धेच्या अव्वल आठ फेरीच्या सामन्यात रविवारी दोन्ही निकाल असेच लागले. इंग्लंड आणि श्रीलंका या स्पर्धेतच नव्हे तर अलिकडे मर्यादित षटकांच्या सामन्यात आस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्यासाठी हा सामना म्हणजे आस्तित्वाची लढाई होती. यात इंग्लंडने बाजी मारली. दुसरा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात झाला. आज मितीला टी २० क्रिकेटमध्ये भारता इतका बलवान संघ दुसरा निश्चित नाही. पण, नुसता बलवान असून चालत नाही. मैदानावर नियोजन आवश्यक असते आणि तेथेच गौतम गंभीर आल्यापासून आपण प्रत्येक महत्वाच्या सामन्यात मार खाल्ला आहे. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला पराभव हा धक्कादायक वगैरे नव्हे, तर अपेक्षितच होता.
मुळात टी २० हे क्रिकेटचे लघुत्तम प्रारुप असले, तरी ते अधिक वेगवान आहे. येथे प्रत्येक चेंडूला सामन्याचे पारडे बदलत जाते. आयसीसीच्या पॉवर प्लेच्या नियमाने फलंदाजांना मुक्त वावर दिला. या सहा षटकांचा वापर फलंदाज कसे करतात यावर बरेच काही अवलंबून असते. त्यानंतर अखेरची तीन षटके निश्चित महत्वाची असतात. पहिल्या सहा षटकांत मिळालेला धावांचा वेग नंतर येणाऱ्या फलंदाजांना मधली षटके खेळून काढायला आत्मविश्वास देत असतो. ही मधली षटके देखिल तेवढीच महत्वाची असतात. संघाच्या डाव या षटकांतच मागे पुढे होत असतो यात शंका नाही. त्यानंतर अखेरची तीन चार षटके निर्णायक ठरत असतात. विश्वचषक स्पर्धेत भारताला आतापर्यंत या पॉवर प्लेचा फायदाच घेता आलेला नाही. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा हे स्पर्धा पूर्व काळात या आघाडीवर कमालीचे लोकप्रिय झाले होते. प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाल्यावर मात्र ही दोन्ही अस्त्र पूर्ण अपयशी ठरली. अभिषेक शर्माला तर तीन सामन्यात खातेही उघडता आलेले नाही. संजूवर तसा कधीच विश्वास दाखवला गेला नाही. खेळला की आत अपयशी ठरला की बाहेर अशी त्याची गत करुन ठेवली आहे.
सर्वात मुख्य म्हणजे संघातील डावखुऱ्या फलंदाजांचे नियोजन हा सर्वात मोठा चर्चेचा विषय होते. एक काळ असे होता की प्रतिस्पर्धी संघा डावखुऱे फलंदाज असायचे आणि त्यावर भारतीय गोलंदाजांची लय बिघडून जायची. आता आपल्याकडे डावखुरे फलंदाज आहेत. पण, प्रतिस्पर्धी गोलंदाजांची ल बिघडली नाही. त्यांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक प्रारुप असूनही ऑफ स्पिन गोलंदाजांचा सुरेख वापर केला आणि त्यात भारताचे नियोजन ढासळले. याचा विचार केला जात नाही. स्पर्धेच्या साखळीत भारत अपराजित राहिले, पण प्रत्येक सामन्यात गोलंदाजांचे योगदान मोठे होते हे नाकारुन चालणार नाही. फलंदाजांच्या आघाडीवरील चुका सुधारण्याकडे लक्षच दिले जात नव्हते. त्याचा फटका समोर दक्षिण आफ्रिका सारखा तगडा संघ समोर आल्यावर बसला. याहीपेक्षा दुःख म्हणजे आपल्या फिरकी गोलंदाजांना यश मिळाले नाही. वरुण चक्रवर्ती चांगला आहे यात शंका नाही. पण, तो अपयशी ठरत असताना दुसरीकडून साथ मिळायला हवी होती आणि त्यासाठी संघात अक्षर पटेल, कुलदीप यादव असायलाच हवे होते. वॉशिंग्टन सुंदरचा ध्यास का धरला गेला हेच कळत नाही. कुलदीपवर दाखवला जाणारा अविश्वास संघापेक्षा एका चांगल्या गोलंदाजांचे खच्चीकरण करतोय हे संघ व्यवस्थापन मान्य करत नाही. जी स्थिती सॅमसनची आहे, तीच कुलदीपची आहे. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने तीन गडी बाद केले. मार्करमने चतुराई करताना पहिले षटक घेतले आणि इशान किशनची विकेट मिळविली. आपल्या फिरकी गोलंदाजांनी काय केले.
आता पराभव झाल्यावर पुन्हा संघात बदल. संजू आत, कुलदीपचा समावेश मग पुन्हा ते अपयशी कारण आता प्रत्येक सामना दडपणाचा असणार आहे. आता आपल्याला दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावेच लागतील. अशा वेळी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्याचे महत्व वाढणार आहे. अर्थात, प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत गळ्यापर्यंत आले की खेळायचे ही आपली परंपरा आहे. ती या वेळी देखिल कायम राहणार आहे. आपण, याही दिव्यातून बाहेर पडू निश्चित बाहेर पडू . पण, त्यासाठी मैदानावरील कामगिरीला नियोजनाची जोड असायलाच हवी. त्यासाठी असा एक धक्का अपेक्षित होता. दक्षिण आफ्रिकेचा डाव बघितला तर नियोजन काय असते हे तुमच्या लक्षात येईल. ३ बाद २० अशा नाजूक परिस्थितीतून त्यांनी शेवटी १८७ धावांची मजल गाठली. धावफलक हलता ठेवणे हे महत्वाचे असते. त्यासाठी धावा आवश्यक असतात. त्या फक्त चौकार, षटकारांनी येत नसतात. हे मुलभूत समीकरणच आपले फलंदाज विसरले आहेत. मोठे फटके मारले म्हणजेच गोलंदाजांवर दडपण येते असे नाही, कधी कदी क्षेत्ररक्षणावरही दडपण असणे आवश्यक असते. सुनिल गावसकर, महंमद अझरुद्दीन, मियाँदाद, मुदस्सर नझर, डेव्हिड बून, जेफ मार्श हे या धाटणीतले फलंदाज होते.
पहिल्या सामन्यात देखिल असेच झाले. इंग्लंडचे फलंदाज श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर काय करत होते तेच कळत नव्हते. पण, फिल साल्ट एक बाजू लावून खेळत होता. त्याने धावफलक हलता ठेवला आणि विल जॅक्सने शेवटी केवळ १४ चेंडू खेळून २१ धावा करताना सगळे चित्र पालटून टाकले. अर्थात, टी २० क्रिकेटमध्ये १४६ धावसंख्या ही काही आव्हानात्मक नाही. ती अशी पार करता येऊ शकते. पण, त्यासाठी फलंदाजी आणि परिस्थितीचे भान असायला हवे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी संयम बाळगला. जोफ्रा आर्चरने चेंडूचा वेग ठेवताना तो उसळविण्याचे धाडस दाखवले. चेंडू बाहेर ठेवला. फिरकी गोलंदाजांनी टप्पा अचूक ठेवला. या सगळ्याा फायदा त्यांना झाला. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी अलिकडच्या काळात कदाचित इतके मोठे यश प्रथमच मिळविले असेल. श्रीलंकेचे सात फलंदाज इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी बाद केले. या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आतापर्यंतचे यश हे तसे नशीबाचाच भाग होते. त्यामुळेच अव्वल आठ संघांच्या फेरीत आता आस्तित्व पणाला होते. या आस्तित्वाच्या लढाईत इंग्लंडने बाजी मारली आहे. त्यांचा विजय नुसता विजयच नव्हता, तर त्यांच्या निव्वळ धावगतीला भक्कम आधार मिळाला जो पुढे जाऊन निश्चित निर्णायक ठरणार आहे. कारण, त्या गटातील एक सामना पावसामुळे वाया गेला आहे. तेच भारताचे झाले आहे. भारताचा पराभव इतका दारुण आहे की त्याच्या निव्वळ धावगतीवर परिणाम होणार आहे. सध्या भारताची निव्वळ धावगती उणे ३.८ आहे. म्हणजे तुम्हीच बघा पुढील सामने किती मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.


