Money Laundering Case: क्रिकेट जगतातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कथित बेकायदेशीर बेटिंग साइटच्या ऑपरेशनशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ६ नोव्हेंबर रोजी ही घोषणा केली. रैना आणि धवन यांच्या पाठोपाठ, इतर सेलिब्रिटींनाही ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. बेकायदेशीर बेटिंग अॅप्सशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी एजन्सी करत असताना शिखर धवन आणि सुरेश रैना ईडीच्या चौकशीत आले. या अॅप्सवर व्यक्ती आणि गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा किंवा मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याचा आरोप आहे.
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त
ऑनलाइन बेटिंग साइट १xBet विरुद्धच्या प्रकरणात धवनची ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि रैनाचे ६.६४ कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड जप्त करण्यासाठी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तात्पुरता आदेश जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संघीय एजन्सीच्या तपासात असे आढळून आले आहे की दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी जाणूनबुजून OneXBet आणि त्याच्या सरोगेट्सना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशी कंपन्यांशी एंडोर्समेंट करार केले होते. या तपासाचा एक भाग म्हणून, ईडीने युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा, अभिनेता सोनू सूद, उर्वशी रौतेला, तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार मिमी चक्रवर्ती आणि बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांच्यासह इतर माजी क्रिकेटपटूंचीही चौकशी केली आहे.
दरम्यान, रैना आणि धवन सप्टेंबरमध्ये एका कथित बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले होते. या हजेरीदरम्यान, बेकायदेशीर बेटिंग अॅप, OneXBet च्या चौकशीचा भाग म्हणून मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या (PMLA) अंतर्गत त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी रिअल-मनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारा कायदा आणला होता.
तथापी, ईडीचा तपास बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBet शी संबंधित अनेक राज्यांमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे. तपासात असे आढळून आले की 1xBet आणि त्याचे “सरोगेट ब्रँड”, जसे की 1xBet आणि 1xBat स्पोर्टिंग लाइन्स, भारतात परवानगीशिवाय ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराचा प्रचार करत होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, रैना आणि धवन यांनी या प्लॅटफॉर्मचा प्रचार करण्यासाठी परदेशी कंपन्यांशी सहयोग केला आणि त्यांना परदेशी चॅनेलद्वारे पैसे दिले गेले.


