Team India Jersey Sponsor: आशिया कप 2025 दरम्यान टीम इंडियाच्या जर्सीवर आता अपोलो टायर्सचे नाव दिसणार आहे. ड्रीम 11 शी झालेल्या कराराच्या समाप्तीनंतर, बीसीसीआयने तीन वर्षांसाठी अपोलो टायर्सला जर्सी प्रायोजक म्हणून नियुक्त केले आहे. करारानुसार, कंपनी बीसीसीआयला 2027 पर्यंत 579 कोटी रुपये देणार आहे.
अपोलो टायर्स प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 4.5 कोटी रुपये देईल, जे पूर्वी ड्रीम 11 देत असलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. भारतीय संघ आशिया कप 2025 मध्ये सध्या कोणत्याही प्रायोजकाशिवाय खेळत आहे. त्याचप्रमाणे, भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत सध्या जर्सी प्रायोजकशिवाय आहे.
आगामी महिला विश्वचषकात महिला संघाच्या जर्सीवर नवीन प्रायोजक दिसेल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. बीसीसीआयने 2 सप्टेंबर 2025 रोजी जर्सी प्रायोजकांसाठी नवीन बोली नियम जाहीर केले होते. या नियमांनुसार गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो आणि तंबाखू कंपन्यांना बोली लावण्याची परवानगी नव्हती. पूर्वी ड्रीम 11 बीसीसीआयचा प्रमुख प्रायोजक होता.
दरम्यान, जुलै 2023 मध्ये झालेल्या कराराअंतर्गत ड्रीम 11ला पुरुष, महिला, अंडर-19 आणि भारत-अ संघाच्या किटसाठी प्रायोजकत्व मिळाले होते. भारत सरकारच्या नवीन कायद्यामुळे हा करार संपल्यावर ड्रीम 11ला कोणताही दंड भरण्याची गरज नाही. आज ड्रीम 11चे ब्रँड मूल्य सुमारे 8 डॉलर अब्ज आहे. तथापी, कंपनीने आयपीएलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.


