नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यातच Samsung ने भारतात महागडे स्मार्टफोन आणण्याचा विचार केला आहे. त्यानुसार, कंपनीने Galaxy Forever नावाचा एक नवीन प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामअंतर्गत, ग्राहक आता फ्लॅगशिप फोनची पूर्ण किंमत न भरता ते खरेदी करू शकतील. हे केवळ ईएमआय प्लॅनपेक्षा वेगळे आहे.
या स्कीममागे कंपनीचा उद्देश स्पष्ट आहे की, आपले प्रीमियम फोन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना दरवर्षी नवीन फोन हवा असतो पण त्यासाठी मोठी रक्कम आगाऊ भरायची नसते. या योजनेअंतर्गत, ग्राहक Samsung Galaxy S26 Ultra किंवा Galaxy S26 + सारखे फोन १२ महिन्यांच्या व्याजमुक्त हप्त्यांमध्ये पैसे भरून निम्म्या किमतीत वापरू शकतात. नो-कॉस्ट ईएमआयची संकल्पना जुनी असली तरी, कंपनीने काही नवीन सेवा देखील आणल्या आहेत.
तुम्ही फोन खरेदी करत नाही, तर तो वर्षभर वापरत आहात, असेच एकप्रकारे गणित आहे. ग्राहकांना फोनची पूर्ण किंमत देण्याची गरज नाही. त्यांना फक्त किमतीच्या अंदाजे ५०% रक्कम हप्त्यांमध्ये भरावी लागेल, जे १२ महिन्यांपर्यंत चालतील. याव्यतिरिक्त, एक निश्चित मासिक प्रोग्राम शुल्क देखील आवश्यक आहे.
एका वर्षानंतर, तुमच्याकडे तीन पर्याय राहतात. फोन परत करणे, तो स्वतःकडे ठेवणे, किंवा नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड करणे. कंपनी याला रिटर्न, रिटेन किंवा अपग्रेड असे म्हणते. जर तुम्ही फोन परत केला, तर तुम्हाला उर्वरित रक्कम भरावी लागणार नाही. जर तुम्हाला तो स्वतःकडे ठेवायचा असेल, तर तुम्हाला उर्वरित ५०% रक्कम पुढील हप्त्यांमध्ये भरावी लागेल.


