Bachchu Kadu On Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांच्यावरचे आश्वासन न पाळल्याचा कलंक धुऊन टाकावा. त्यांनी हा निर्णय घेतला, तर महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेईल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा देत असलेले बच्चू कडू गुरुवारी सकाळी शिष्टमंडळासह मुंबईकडे रवाना झाले आहेत. संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याबाबत निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
राजकारण बाजूला ठेवा, कर्जमाफीचे श्रेय सरकारलाच द्या
प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘लोकांच्या वेदना आणि आक्रोशामुळेच शेतकरी रस्त्यावर उतरले. हे आंदोलन राजकीय नाही. सरकारने हा विषय श्रेयासाठीचा खेळ बनवू नये. कर्जमाफी केली तर त्याचे श्रेय बच्चू कडूला नाही, सरकारलाच द्यावे. लोकांमध्ये आधीच असंतोष आहे, त्यामुळे बनवाबनवी नको. ‘दोन वर्षांनी करू’, ‘तीन वर्षांनी करू’ असं सांगून वेळ मारून नेऊ नका.
त्यांनी पुढे म्हटलं की, मुख्यमंत्र्यांवर लोकांमध्ये टीका होतेय. लाडकी बहीण योजनाप्रमाणे कर्जमाफीही निवडणुकीपूर्वी होईल, अशी चर्चा सुरू आहे. पण हा आरोप धुण्याची हीच योग्य वेळ आहे. बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या धोरणावरही टीका केली. सरकार म्हणते शेतकऱ्यांना रोख मदत देऊ, पण ही फक्त दोन ते पाच हजार रुपयांची मदत काही उपयोगाची नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णायक बैठक आज मुंबईत पार पडणार आहे. सरकारने या वेळी ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभरात पुन्हा तीव्र आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.


