पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांवर माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जमीन व्यवहारावरुन आरोप केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्या अमीडीया हेल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या खरेदी व्यवहारानंतर फक्त दोन दिवसांमध्ये स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचा दावा देखील अंबादास दानवे यांनी केल्याने आता या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. विरोधक या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करत आहे. त्यानंतर आता यामध्ये पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण या प्रकरणामध्ये आता अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंची चौकशी समिती, तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं तातडीने निलंबन करण्यात आलं आहे.
दरम्यान या प्रकरणावर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. ते म्हणाले की, आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली. मात्र, या प्रकरणात अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांनी नाकार दिला. पार्थ पवार यांनी या प्रकरणात अधिक माहिती देण्यास नाकार दिल्याने विरोधकांना राज्य सरकारवर जोरदार टीका करण्याची संधी मिळाली आहे.
चौकशी होणार-देवेंद्र फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील या प्रकरणात प्रतिक्रिया समोर आली. माध्यमांशी बोलताना या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महसूल विभाग असेल आयजीआर असेल, जमिनी संबंधित रेकॉर्ड असतील या संदर्भातील सगळी माहिती मी मागवली आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशीचे आदेश देखील मी दिले आहे. या संदर्भात सगळी माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी तुम्हाला सगळी माहिती देणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल.
अंबादास दानवेंचे आरोप काय?
मेवाभाऊंच्या राज्यात… 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.
या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते? हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे. दुसरी बाब, सरकारी यंत्रणांवरही त्यांनी निशाणा साधला.


