पुणे: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीचे मतदान केंद्रांच्या याद्या आणि जिल्हा परिषद गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (दि.12 नोव्हेंबर) दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. यामुळे बुधवारी या मतदार याद्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. या याद्या आता येत्या 24 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे या याद्यांना आणखी 12 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता येत्या 15 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत लागू होईल, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या वृत्ताला राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ सुत्रांकडून दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या अनुक्रमे गट आणि गणनिहाय अंतिम मतदार याद्या पाहण्यासाठी दि.3 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदार याद्या आपापल्या तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने याआधी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीच्या कार्यक्रमानुसार दि. 12 नोव्हेंबर रोजी या गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका (नगरपरिषदा) आणि 42 नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्रातील 26 जिल्हा परिषदा आणि 286 पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. 20 मार्च आणि दि. 13 मार्च 2022 रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि 50 पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.


