Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यात थंडीचा जोर अचानक कमी झाला असून, राज्यातील गुलाबी थंडी जवळपास गायब झाली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे मंदावल्याने तापमानात मोठी वाढ झाली आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.
हवामान विभागाने येत्या २-३ दिवसांत कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार सरांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
कालपर्यंत (२२ नोव्हेंबर) धुळे येथे राज्याचे नीचांकी ८.५° सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते, तर जळगाव आणि परभणीमध्येही पारा ११° च्या खाली होता. मात्र अवघ्या २४ तासांतच चित्र पालटले. कोकणातील डहाणू येथे कमाल तापमान ३५.३° सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दुपारी उकाडा आणि उष्णता जाणवत असून, रात्रीही थंडीचा फारसा प्रभाव राहिलेला नाही.
हवामानातील हे अचानक बदल आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. सर्दी, खोकला, ताप आणि इतर श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. नागरिकांना गरम कपडे, पाणी आणि आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


