Shrirampur Abduction Case: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आज सकाळी मोठा प्रकार घडला असून, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय संघर्ष उफाळून आल्यानंतर आता हा प्रकार प्रत्यक्ष हिंसाचारात परिवर्तित झाल्याचे स्पष्ट होत आहे. घटनेनंतर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मॉर्निंग वॉकदरम्यान अपहरण
सचिन गुजर आज सकाळी नेहमीप्रमाणे सातच्या सुमारास सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्याचवेळी त्यांना दोन व्यक्तींनी जबरदस्तीने गाडीत ओढून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही तासांनी मारहाण झालेल्या अवस्थेत त्यांना रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आले.
अपहरणकर्त्यांचा हिंदुत्ववादी गटाशी संबंध?
या घटनेत सहभागी असलेले काही संशयित हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप समोर आला आहे. अपहरण आणि नंतर झालेल्या मारहाणीचे काही क्षण परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचं सांगण्यात येत आहे. फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्ते, आमदार हेमंत ओगले, तसेच गुजर यांचे कुटुंबीय तात्काळ श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. या घटनेची गंभीरता लक्षात घेता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – अहिल्यानगर हळहळलं..! सख्ख्या भाऊ-बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पेटले
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आधीच आरोप–प्रत्यारोपांचा जोर सुरू असताना, जिल्हाध्यक्षांच्या अपहरणाच्या घटनेने शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यामागे विरोधी गटाचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.


