Pandharpur News : प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरू असताना रक्तपेढीने चुकीचा रक्तगट देण्याच्या भयावह दुर्घटनेत पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील २२ वर्षीय आरती सुरज चव्हाण यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर तीनच दिवसांत घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांत शोककळा पसरली असून, नवजात बाळ आता अनाथ झालं आहे. कुटुंबीयांनी रक्तपेढी आणि दोन्ही खासगी रुग्णालयांवर गंभीर आरोप करत कायदेशीर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
आरती चव्हाण यांना काही दिवसांपूर्वी पंढरपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रसूती पार पडली, पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिची स्थिती गंभीर झाली. डॉक्टरांनी कुटुंबीयांना ओ पॉझिटिव्ह रक्ताची गरज सांगितली. कुटुंबीयांनी तात्काळ एका ब्लड बँकेतून रक्ताची पिशवी आणली आणि ती चढवण्यात आली. मात्र, रक्त चढवल्यानंतर आरतीचा त्रास आणखी वाढला. डॉक्टरांनी तिची सोलापूर येथील दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
सोलापूर रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही तिला रक्त चढवण्यात आलं, पण तीन दिवसांपर्यंत स्थितीत सुधारणा नव्हती. गुरुवारी (५ डिसेंबर) दुपारी डॉक्टरांच्या लक्षात आलं की, ब्लड बँकेने चुकीचा रक्तगटाची पिशवी दिली होती. चुकीचं रक्त चढल्याने आरतीच्या शरीरात प्रतिक्रिया घडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर मोठा आक्रोश केला.
‘बाळ अनाथ झालं, न्याय मिळवू’, कुटुंबाचा आक्रोश
आरतीचा पती सुरज चव्हाण यांनी सांगितलं की, “प्रसूतीनंतर सर्व काही ठीक चाललं होतं, पण रक्त चढवण्याच्या चुकीमुळे आम्हाला हा जबरदस्त धक्का बसला. नवजात बाळ आता आईशिवाय राहणार आहे. रक्तपेढीने चुकीची पिशवी दिली, हे सिद्ध झालं तरी डॉक्टरांनी ताबडतोब तपासलं नाही. आम्ही दोन्ही रुग्णालयं आणि ब्लड बँकेविरोधात तक्रार दाखल करणार आहोत.”
रक्त चढवण्याची प्रक्रिया कशी चुकली?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, चुकीचा रक्तगट चढवल्याने रक्तसंक्रमण (blood transfusion reaction) होऊ शकतं, ज्यामुळे रक्तस्त्राव वाढतो आणि अनेक अवयव अपयशी ठरतात. या प्रकरणात ओ पॉझिटिव्ह रक्ताची गरज असताना दुसरा गट चढवला गेल्याने आरतीची स्थिती आणखी बिघडली. सोलापूर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तक्रार नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.


