BMC Election 2026: मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) रणसंग्रामाचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. ‘ठाकरे विरुद्ध महायुती’ अशा चुरशीच्या लढतीत मुंबईची सत्ता कोणाकडे जाणार, याबाबतचा पहिला कल आता समोर आला आहे. ‘व्होट वाईब इंडिया’ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत भाजप-शिंदे जोडी आणि ठाकरे बंधू यांच्यात काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.
जादुई आकडा कोण गाठणार?
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी लागणारा ११४ हा बहुमताचा आकडा गाठताना महायुतीला कसरत करावी लागणार असल्याचे दिसते. अमिताभ तिवारी (संस्थापक, व्होट वाईब इंडिया) यांच्या विश्लेषणानुसार मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांच्या निकालाचे चित्र अत्यंत चुरशीचे दिसत आहे. या अंदाजानुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मिळून ११४ जागांचा बहुमताचा आकडा गाठताना दिसत असून, यामध्ये भाजपला ८२ तर शिंदे गटाला ३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्या युतीला ७९ जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेस स्वबळावर लढल्यास त्यांना १९ जागांवर समाधान मानावे लागेल, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित १० जागा इतर लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केल्याने यंदाची निवडणूक अधिक रंजक झाली आहे. मुंबईतील ४० टक्के मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठाकरे बंधूंची भावनिक लाट निर्णायक ठरू शकते. गेल्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी मविआला साथ दिली होती. मात्र, आता काँग्रेस स्वतंत्र लढत असल्याने ही मते विभागली जाण्याची भीती आहे. ही मते जर मोठ्या प्रमाणावर ठाकरे युतीकडे वळाली, तर निकालाचे चित्र पूर्णपणे पालटू शकते.
महायुतीसमोर ‘मराठी’ मतांचे आव्हान
गेल्या आठ वर्षांत भाजपने मुंबईत आपली ताकद मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांची शिवसेना किती मराठी मते आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरते, यावरच महायुतीचे भवितव्य अवलंबून असेल. जर शिंदे गटाने मराठी मतांमध्ये मोठी फूट पाडली, तर भाजपला ‘मुंबई काबीज’ करणे सोपे जाईल; अन्यथा ठाकरे बंधूंचा ‘मराठी बाणा’ महायुतीची सत्तास्थापनेची स्वप्ने धुळीस मिळवू शकतो.


