Ashes 2026: सातत्याने अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाने बॉक्सिंग डे कसोटीचा मुहूर्त साधत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. विशेष म्हणजे, 2011 नंतर तब्बल 14 वर्षांनी इंग्लंडने ऑस्ट्रेलियन भूमीवर विजय मिळवला आहे. या प्रदीर्घ कालावधीत इंग्लंडला 16 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता.
दोन दिवसांतच सामन्याचा निकाल
अॅशेस मालिकेतील यंदाचा हा दुसरा सामना आहे जो केवळ 2 दिवसांत संपला. यापूर्वी पहिली कसोटीही दोन दिवसांत आटोपली होती, ज्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. मात्र, मेलबर्नमध्ये इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी परिस्थितीचा अचूक फायदा उचलत कांगारूंचे कंबरडे मोडले. दोन्ही डावात फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव पत्त्यासारखा कोसळला
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 4 धावांपासून खेळाला सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 34.3 षटकांत केवळ 132 धावांत गारद झाला. ब्रायडन कर्सने 4, तर कर्णधार बेन स्टोक्सने 3 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला स्वस्तात गुंडाळले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड (46), स्टीव्ह स्मिथ (24) आणि कॅमेरुन ग्रीन (19) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.
‘बॅझबॉल’ रणनीती यशस्वी
विजयासाठी मिळालेले 175 धावांचे आव्हान इंग्लंडने आपल्या आक्रमक ‘बॅझबॉल’ शैलीत पूर्ण केले. झॅक क्रॉली (37) आणि बेन डकेट (34) यांनी 51 धावांची दमदार सलामी दिली. मधल्या फळीत जेकब बेथेलने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत विजय सुकर केला. अखेरीस हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. इंग्लंडने 32.2 षटकांत 6 बाद 178 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. या मालिकेत आतापर्यंत 25 बळी घेणाऱ्या मिचेल स्टार्कला या सामन्यात अपयश आले, जे ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.


