छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठा स्फोट झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आज (३० डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली. “भाजपच्या अहंकारामुळे आणि दुहेरी भूमिकेमुळे आम्ही युती तोडतोय,” असा थेट हल्ला चढवत शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. या घोषणेमुळे संभाजीनगरात राजकीय वातावरण तापले असून, निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता वाढली आहे.
पत्रकार परिषदेत शिरसाट म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युती व्हावी म्हणून स्वतः प्रयत्न केले. अनेक बैठका झाल्या, फोनवर चर्चा झाल्या. शेवटी मुख्यमंत्र्यांसमोर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. पण प्रत्यक्षात जागा देण्याची वेळ आली तेव्हा भाजपने आमच्या कार्यकर्त्यांना कमी लेखून फक्त त्यांच्या जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला. ही दुहेरी भूमिका आम्हाला मान्य नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्वाभिमानाचा विचार करून युती तोडण्याचा निर्णय घेतला.”
सूत्रांच्या माहितीनुसार, संभाजीनगर महापालिकेत एकूण ११५ जागा असून, युतीत भाजपला ७० आणि शिंदे सेनेला ४५ जागा मिळणार होत्या. मात्र, भाजपने शिंदे सेनेच्या पारंपरिक जागांवर दावा केल्याने वाद उफाळला. शिरसाट यांनी पुढे म्हटले, “भाजपला वाटते की त्यांची ताकद वाढली आहे, ते काहीही करू शकतात. पण आम्हीही कमकुवत नाही. युती तुटली तरी आम्ही एकटे लढू आणि विजय मिळवू. फडणवीस आणि बावनकुळे यांच्या अहंकाराचा अंत आज झाला.”
दरम्यान, भाजपने या आरोपांना उत्तर देत म्हटले की, “शिवसेना स्थानिक पातळीवरची मागणी पूर्ण करू शकली नाही, त्यामुळे युती तुटली. आम्ही कार्यकर्त्यांच्या हितासाठी स्वतंत्र लढणार.” या घटनेने महायुतीतील तणाव वाढला असून, महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, नामांकनाचा आज शेवटचा दिवस आहे. राजकीय वर्तुळात या युती तुटण्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.


