पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आल्यास शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही समाधान वाटेल, असं स्पष्ट मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं. राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही, असंही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना निलेश लंके म्हणाले की, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास नक्कीच आनंद होईल. राष्ट्रवादी हा केवळ पक्ष नसून पवार साहेबांचा परिवार आहे. हा परिवार जर एकसंधपणे सामाजिक आणि राजकीय काम करत राहिला, तर ते सर्वसामान्य जनतेलाही स्वीकारार्ह ठरेल.”
पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “खऱ्या अर्थानं पुण्याच्या विकासाची सुरुवात शरद पवारांनी केली. औद्योगिकीकरण आणि आयटी सेक्टर पुण्यात आणण्याचं मोठं काम त्यांनी केलं. त्याच पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून या शहरांना वेगळ्या उंचीवर नेलं.”
प्रचारादरम्यान निलेश लंके यांनी प्रभाग क्रमांक 26 मध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. “आमचे चारही उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होतील. जनतेत सध्या प्रचंड आक्रोश आहे. दडपशाही करून अनेक उमेदवारांना बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले, विविध प्रकार राबवले गेले, पण हे प्रकार जनतेला मान्य नाहीत,” असा आरोपही त्यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी पवार परिवार हा सुख-दुःखात नेहमीच एकत्र राहिला आहे. दादांना जे समाधान आहे, तेच समाधान सर्वांनाच आहे. सगळे एकत्र आल्यानंतर पवार साहेबांनाही नक्कीच समाधान वाटेल. राजकारण हे क्षणोक्षणी बदलत असतं. त्यामुळे भविष्यात काय होईल, याचं भाकीत कोणीही करू शकत नाही.”
दरम्यान, पुण्यात अजित पवार गटाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना संधी दिल्याच्या आरोपांवर बोलताना निलेश लंके म्हणाले की, “उमेदवार पात्र असतील, योग्य प्रक्रिया पूर्ण केली असेल, तरच त्यांना उमेदवारी देण्यात आली असेल,” असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. निलेश लंके यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना नव्यानं उधाण आलं आहे.


