Delhi Riots Case: २०२० च्या दिल्ली दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने या दोघांचे जामीन अर्ज फेटाळले असून त्यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे. मात्र, याच प्रकरणातील इतर पाच आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणाला मिळाला जामीन?
न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने सोमवारी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा-उर-रहमान, मोहम्मद सलीम खान, शादाब अहमद या पाच आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचा – दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा! आरोपी डॉक्टराकडून सिग्नल अॅप, आय-20 कार खरेदीसह धक्कादायक माहिती उघड
दिग्गज वकिलांची फौज मैदानात
या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता दोन्ही बाजूंनी वरिष्ठ वकिलांनी युक्तिवाद केला. आरोपींच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, सिद्धार्थ दवे, सलमान खुर्शीद आणि सिद्धार्थ लुथरा यांनी बाजू मांडली. तर दिल्ली पोलिसांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी जामीन देण्यास विरोध केला. गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.
काय आहे प्रकरण?
फेब्रुवारी २०२० मध्ये ईशान्य दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात निदर्शने सुरू असताना हिंसाचार उसळला होता. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते. उमर खालिद, शरजील इमाम आणि इतरांवर या दंगलीचा मुख्य कट रचल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २ सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या सर्वांचा जामीन फेटाळला होता, ज्याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आजच्या निर्णयामुळे उमर आणि शरजील यांच्या अडचणी कायम राहिल्या आहेत.


