मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून, सर्व पक्षांनी वचननाम्यांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच शिवसेना (शिंदे गट) मुंबईसाठी स्वतंत्र वचननामा जाहीर करण्याच्या तयारीत असून, या वचननाम्यातील काही महत्त्वाच्या घोषणा निवडणुकीत गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
लवकरच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा वचननामा अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे. या वचननाम्यात प्रामुख्याने महिला आरोग्य, सार्वजनिक आरोग्यसेवा, प्रदूषण नियंत्रण, वाहतूक, झोपडपट्टी पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
महिला आरोग्यावर विशेष लक्ष
मुंबईत महिलांमध्ये वाढत असलेल्या कर्करोगाच्या घटनांची गंभीर दखल घेत, महिलांसाठी कर्करोगावरील औषधे मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच स्तन कर्करोगावरील सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.
आरोग्यसेवा अधिक सक्षम
परळ येथील KEM रुग्णालय एम्सच्या धर्तीवर अत्याधुनिक करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने मुंबई महानगरपालिकेची इतर रुग्णालयेही आधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज केली जाणार आहेत.
शिक्षण व कौशल्य विकास
बाळासाहेब ठाकरे विद्यापीठाची स्थापना करून येथे अल्पदरात डिप्लोमा कोर्सेस सुरू केले जाणार आहेत, ज्याचा लाभ तरुणांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
प्रदूषणमुक्त मुंबईचा संकल्प
वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईत असलेल्या 7 एअर प्युरिफायरची संख्या वाढवून 60 एअर प्युरिफायर MPCB आणि BMC तर्फे उभारण्यात येणार आहेत.
तसेच प्रदूषण रोखण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात 5 हजार मिनी ई-बेस्ट बसे दाखल केल्या जाणार आहेत.
नद्या आणि जलप्रदूषणावर नियंत्रण
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवण्यात येणार असून मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांवरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (STP) क्षमता वाढवली जाणार आहे. झोपडपट्टी भागातही छोटे STP उभारून जलप्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
भुयारी सुविधा आणि रस्ते
मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करताना वीज, पाणी, गॅस, केबल यांसाठी भूयारी प्रकल्प राबवले जाणार आहेत.
पागडी व सेस इमारतींचा न्याय्य पुनर्विकास
मुंबईतील 19 हजारांहून अधिक पागडी व सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाणार असून, फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी नवीन योजना आणली जाणार आहे.
झोपडपट्टी पुनर्विकासाला चालना
50 एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या जमिनींवर एकत्रित झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात मुंबईतील 17 प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामुळे लाखो झोपडपट्टीवासीयांना दिलासा मिळणार आहे.
वाहतूक कोंडीवर तोडगा
मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी इंटिग्रेटेड भुयारी रस्ता नेटवर्क उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कोस्टल रोड, बीकेसी येथील बुलेट ट्रेन स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (T2) यांना जोडणारा भुयारी कॉरिडॉर उभारण्याचा डीपीआर प्रक्रियेत आहे. हे मेट्रो नंतरचे मुंबईचे तिसरे महत्त्वाचे प्रवास माध्यम ठरणार आहे.


