पाबळ: देशात, राज्यात आणि अगदी पुण्या-मुंबईत ज्या गतीने भाजपा वाढतोय ते पाहता भाजप आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागातही वाढला पाहिजे. मात्र शिरुर तालुक्यातील भाजपाच्या नेते-पदाधिका-यांचा ‘कॉन्फिडन्स’ इतका खालावलाय की, ते आता निवडणूकीच्या रणांगणातूनच पळ काढू लागलेत. पाबळ-केंदूर गटात हीच वस्तुस्थिती भाजपा निष्ठावंतांकडून बोलली जात असून, आयुष्यभर राष्ट्रवादीत राहिलेल्या विकासनाना गायकवाड व दिपक खैरे यांना भाजपाची उमेदवारी देवून कट्टर निष्ठावंत असलेल्या अमित सोनवणे व सतीशशेठ साकोरे यांना डावलले गेले. पर्यायाने ज्या पाबळ-केंदूर गटात माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भगवान शेळके यांनी उभे राहणे गटाला अपेक्षित होते, तिथे अगदी ठरवून ’गायकवाड-खैरे’ या एकाच गावातील दोघांना उमेदवारी देवून भाजपा पार्टी पणाला लावली गेलीय. त्याचे कारण काय तर जे-काही होईल ते परस्पर होईल, म्हणजेच परस्परमं समर्पयामी…!
अमित सोनवणे व सतीशशेठ साकोरे यांचे नेमके चुकले काय ?
वाजेवाडीचे उपसरपंच, सोसायटीचे अध्यक्ष, दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे स्वीय सहायक तसेच वाजेवाडी गाव आदर्श आमदार-ग्राम म्हणून विकसीत केले तेच हे अमित सोनवणे. अत्यंत निष्ठावाण हा कार्यकर्ता. कुणालाही न भिणारा, विकास कामांना गवसणी घालणारा आणि शासकीय योजनांची पूर्ण माहिती असणारा हा कार्यकर्ता. सतीशशेठ साकोरे हेही त्याच प्रकारातले. माहिती अधिकार कायदा, भाजपा कृषी संघटनेत मोठे स्थान, मंत्री मेघना बोर्डीकर यांचे कट्टर पाठीराखे आणि त्यांच्या भावकीतील हे कार्यकर्ते. या शिवाय कुणालाही अर्ध्या रात्री मदतीला धावणारे, स्वत:ची प्रतीमा जपणारे हे दोघे कार्यकर्ते. विशेष म्हणजे हे दोघे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते. या दोघांनीही या गटातील इच्छुक म्हणून पूर्ण तयारीने गेली अडीच महिने काम सुरू केले होते. मात्र ’या दोघांकडे पैसे नाहीत, त्यांची जिल्हा परिषद लढण्याची पात्रता नाही..’ असा ठरवून बोभाटा पाबळ-केंदूर गटात सुरू केला व या दोघांबाबत जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांचेकडेही तसे अहवाल दिले गेले. परिणाम काय तर दोघांनाही निवडणूकीच्या प्रक्रीयेतूनच बाहेर काढले गेले.
भाजपा उमेदवारीचे निकष काय ठरविले हे कुणालाच कळेना..!
पाबळ-केंदूर गटात भाजपाची उमेदवारी द्यायची तर त्याचे निकष काय याबाबत कधीच कुणी कुणाला कळू दिले नाही. जो इच्छुक होईल त्याला ’यांची लायकी नाही..’ असे थेट हिणवून या गटात पक्ष पदाधिकारी अक्षरश: मोठ्या संख्येने दुखविले गेले आहेत. पाबळ येथील जेष्ठ भाजपा पदाधिकारी मारुतीशेठ शेळके, जातेगाव खुर्द येथील माजी सरपंच आणि शिरुर तालुक्यातील प्रमुख आंदोलक तसेच आध्यात्मिक आघाडीचे नेते, प्रवचनकार समाधान डोके हेही प्रमुख इच्छुकांमध्ये होते. मात्र या दोघांबाबतीत भाजपाने काहीही नीट भूमिका घेतली नाही. पर्यायाने आता हे पक्ष भूमिकेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


