Raj Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होत असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. अत्यंत बदललेल्या आजच्या राजकारणात ‘लवचिक भूमिका’ घेण्याचे संकेत देत राज ठाकरेंनी आगामी काळातील नव्या रणनीतीचे संकेत दिले आहेत.
बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा
बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करताना राज ठाकरे म्हणाले की, “बाळासाहेब १०० वर्षांनीच काय, तर त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षातही लोकांच्या स्मरणात राहतील. सत्ता येते आणि जाते, पण पिढ्यानपिढ्या प्रभाव टाकू शकतील असे व्यक्तिमत्त्व दुर्मिळ असते.” आजच्या राजकारणात निष्ठा आणि तत्त्वे सहज विकली जात असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
‘लवचिक’ भूमिकेचा शब्द: अर्थ काय?
राज ठाकरे यांच्या पोस्टमधील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे त्यांनी ‘लवचिकते’ बाबत केलेले विधान. त्यांनी म्हटले आहे की, “आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल.” बाळासाहेबांनीही अनेकदा प्रसंगानुरूप लवचिक पवित्रा घेतला होता, परंतु त्यांचे मराठी माणसावरील प्रेम कधीही कमी झाले नाही, असा दाखला देत राज यांनी आपल्या संभाव्य राजकीय बदलांचे समर्थन केले आहे.
मराठी अस्मितेचा लढा धगधगत ठेवणार
आजचे राजकारण केवळ निवडणुकीतील क्लुप्त्या आणि यशावर मोजले जात असले, तरी आपण मराठी भाषा आणि मराठी माणसासाठीचा लढा नेटाने पुढे नेऊ, असा शब्द त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिला आहे. “बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची आमची श्रद्धा कधीही तसूभरही कमी होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय तर्कवितर्क
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि बदललेल्या राजकीय समीकरणांच्या काळात राज ठाकरेंचे हे ‘लवचिक भूमिकेचे’ विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे आगामी काळात मनसे एखाद्या मोठ्या युतीचा भाग होणार का, किंवा आपली कार्यपद्धती बदलणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे.


