Indapur Elections: पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी सकाळी बावडा (ता. इंदापूर) येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी व निरा भिमा कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, कन्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील ठाकरे आणि मुलगा राजवर्धन पाटील उपस्थित होते. संपूर्ण पाटील परिवाराने लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होत आपला मतदानाचा हक्क बजावला.
अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार
मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील भावूक झाले. “उपमुख्यमंत्री स्व. अजितदादांच्या निधनामुळे सध्या सर्वत्र दु:खद वातावरण आहे, अशा स्थितीत आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत,” असे त्यांनी नमूद केले. मात्र, देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व. अजितदादांची विकासाची विचारधारा पुढे चालू ठेवण्यासाठी इंदापूर तालुक्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्यात सत्ता स्थापनेचा ठाम विश्वास
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व २४ उमेदवारांच्या विजयाचा दावा केला आहे. तालुक्यातील जनता सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल आणि भविष्याचा विचार करता पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्विवाद बहुमत मिळवून सत्ता स्थापन करेल, अशी खात्री त्यांनी बोलून दाखवली. मतदानानंतर त्यांनी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
कार्यकर्त्यांना मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन
विविध केंद्रांच्या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. लोकशाही बळकट करण्यासाठी आणि पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील राहून जास्तीत जास्त मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी सक्रिय राहावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


