अष्टपैलू: टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होईपर्यंत वेस्ट इंडिज संघ विजय म्हणजे काय हे विसरला होता. कसोटी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपयश जणू त्यांच्या पाचवीला पूजले होते. त्यांच्या परंपरेला साजेशा हाणामारीच्या टी २० क्रिकेटमध्येही कधी तरी कुठे तरी त्यांना विजय मिळत होता. मात्र, विश्वकरंडक स्पर्धा सुरु झाल्यावर वेस्ट इंडिजने आपली ओळख नव्याने करुन दिली. इंग्लंडविरुद्ध निराशाजनक सुरुवात झाल्यानंतर देखिल वेस्ट इंडिजने आव्हानात्मक मजल मारली. १० षटकांत ४ बाद ७७ आणि नंतर १५ षटकांत ५ बाद १२८ अशा स्थितीतून शेरफन रुदरफोर्ड आणि जेसन होल्डर यांनी विंडीजला धडाका दाखवून दिला. अखेरच्या पाच षटकांत विंडीजने ६८ धावा कुटल्या. शेफर्ड आणि होल्डरच्या बॅटवर आलेला चेंडू मैदानालगत कधीच थांबला नाही. हवाई सफर करत चेंडूने कायम स्टॅण्डच गाठला. या वेळी २०१६ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत बेन स्टोक्सच्या अखेरच्या षटकात १९ धावांची आवश्यकता असताना कार्लोस ब्रेथवेटने ठोकलेल्या चार षटकारांची आठवण निश्चित झाली. आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने अधून मधून आशा पल्लवित केल्या.पण, फिल साल्ट, जोस बटलर आणि जेकब बेथेल या पहिल्या तीन फलंदाजांनंतर इंग्लंडच्या एकाही फलंदाजांने जिंकण्याची वृत्तीच दाखवली नाही. सॅम करुन एका बाजूने लढत राहिला. इंग्लंडचे अखेरचे दहा फलंदाज ३५ धावांत गारद झाले. रोस्टन चेस, गुडाकेस मोटीए यांची गोलंदाजी निर्णायक ठरली.
वेस्ट इंडिजने सलग दुसरा विजय मिळवून आपली लय अजून तरी कायम राखली आहे. हीच लय राखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला झुंजावे लागले. अफगाणिस्तान संघातील खेळाडूंची विजीगीषु वृत्ती पुन्हा एकदा त्यांना विजयापर्यंत नेऊ शकली नाही. नियोजित २० षटकांत सामना बरोबरीत सुटला. रायन रिकल्टन, क्वींटॉन डी कॉक ही नवी जोडी दक्षिण आफ्रिकेकडून खेळली. गोलंदाजी मात्र गोलंदाजांना वेगावर नियंत्रण राखता आले नाही. अखेरच्या षटकात १३ धावांचा बचाव रबाडाला करता आला नाही. दडपणाचा सामना त्याला करता आला नाही. अफगाणिस्तानचा केवळ एक गडी त्याला बाद करायचा होता. पहिल्याच चेंडूवर त्याने ती किमया साधली. पण, तो नोबॉल ठरला. नंतर वाईड, मग पुन्हा नोबॉल टाकला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावा करताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फरुकी बाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये १७ धावांची बरोबरी कायम राहिल्यामुळे पुन्हा सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. त्या वेळी दक्षिण आफ्रिकेने २३ धावा केल्या. केशव महाराजला गोलंदाजी देण्याचा जुगार यशस्वी ठरला. दुसऱ्या चेंडूवर महाराजने महंमद नाबीला बाद केले. पण, नंतर ४ चेंडूंत २४ धावांची गरज असताना गुरबाजने सलग तीन षटकार ठोकले. अखेरचा चेंडू वाइड पडला. आता एका चेंडूंत पाच धावांची आवश्यकता असताना गुरबाज बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेला विजयाचा सुस्कारा सोडता आला.
दुखापतींची घरघर लागलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने आयर्लंडवर सफाईदार विजय मिळविला. यात वेगळे काहीच नव्हते. पण, ऑस्ट्रेलियाचा मार्ग खेळाडूंच्या दुखापतींमुळे सोपा राहणार नाही. कर्णधार मिशेल मार्श पहिल्याच सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या खेळण्याविषयी क्रिकेट ऑस्ट्रेलिया साशंक आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने स्टिव्ह स्मिथला पाचारण केले आहे. अर्थात, ऑस्ट्रेलियाला विजय नवा नाही. त्यांच्या संघात शेवटचा गडी देखिल सामना जिंकून देऊ शकतो. स्वप्नवत खेळी खेळण्याची क्षमता असणारे ट्राविस हेड, ग्लेन मॅक्सवेल त्यांच्याकडे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे टी २० क्रिकेटमध्ये आयपीएलच्या माध्यमातून यशस्वी ठरलेला मार्कस स्टोईनिस त्यांच्याकडे आहे. देशासाठी हा खेळाडू आतापर्यंत आपले म्हणावे तेवढे योगदान देऊ शकला नाही. पण, आज त्याने आपली क्षमता दाखवून दिली. त्याची खेळी ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरली. अॅडम झम्पाने आपली फिरकीची जादू आणि नॅथन एलिसने प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत आपली क्षमता दाखवून दिली. ऑस्ट्रेलियाला पुढे जाण्यासाठी असे एक दोन खेळाडू देखिल पुरे पडतात. ते असे खेळतात की तेव्हा सामना त्यांच्याभोवती फिरत राहतो.
आता अशीच सातत्यपूर्ण कामगिरी आज भारताकडून बघायला मिळेल. अभिषेक शर्माच्या तंदुरुस्तीचा प्रश्न असला, तरी संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू असल्यामुळे भारताला चिंता नाही. प्रतिस्पर्धी नामिबिया देखिल दुबळा आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंची या सामन्यात विक्रमाची रेलचेल करण्यात काहीच हरकत नाही. बघूयात आज काय घडते…पण, आपला खरा सामना रविवारी आहे.


