MPSC Group C Exam: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क (Group C) सेवा भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल केला आहे. यापुढे ‘लिपिक-टंकलेखक’ (Clerk-Typist) आणि ‘कर सहाय्यक’ (Tax Assistant) या पदांसाठी घेतली जाणारी स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आयोगाच्या या पावलामुळे रखडलेली भरती प्रक्रिया आता सुसाट धावणार आहे.
२४ एप्रिलच्या बैठकीत मंजुरी, २० मे रोजी अधिकृत शिक्कामोर्तब
आयोगाच्या २०५ व्या बैठकीत २४ एप्रिल २०२६ रोजी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. त्यानंतर काल, २० मे २०२६ रोजी याचे अधिकृत परिपत्रक जारी करत नव्या नियमांची घोषणा करण्यात आली. या नव्या बदलामुळे गट-क परीक्षेची पारंपरिक रचना बदलली असून विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अतिरिक्त परीक्षेचा ताण हलका झाला आहे.
आता कशी असेल नवी निवड प्रक्रिया?
यापूर्वी विद्यार्थ्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा टायपिंगची परीक्षा द्यावी लागत असे. मात्र, आता ही पद्धत इतिहासजमा झाली असून संपूर्ण प्रक्रिया अवघ्या दोन टप्प्यांत आटोपणार आहे:
१. पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
२. मुख्य परीक्षा (Mains Exam)
उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) तयार करताना केवळ मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांचाच आधार घेतला जाईल.
का घेतला आयोगाने हा निर्णय?
उमेदवारांकडे आधीपासूनच शासनमान्य GCC टंकलेखन प्रमाणपत्र असतानाही आयोगाकडून पुन्हा त्यांची टायपिंग टेस्ट घेतली जायची. एकाच कौशल्याच्या या दुहेरी पडताळणीमुळे प्रशासनाचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा वेळ वाया जात होता. या अतिरिक्त टप्प्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास महिन्यान्-महिने वाट पाहावी लागायची. हीच प्रशासकीय अडचण ओळखून आयोगाने ही अट रद्द केली आहे.
प्रमाणपत्रांची पडताळणी आता शासकीय स्तरावर
नवीन नियमांनुसार, मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची यादी थेट शासनाकडे सुपूर्द केली जाईल. नियुक्तीपूर्वी उमेदवारांनी सादर केलेल्या मूळ टायपिंग प्रमाणपत्रांची कायदेशीर तपासणी संबंधित शासकीय विभागामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांकडे वैध आणि शासनमान्य टायपिंग प्रमाणपत्र असणे बंधनकारकच राहील.
विद्यार्थ्यांचा नेमका काय फायदा होणार?
मुख्य परीक्षा पास झाल्यावरही टायपिंग टेस्टच्या भीतीखाली जगणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मानसिक दिलासा मिळेल. संपूर्ण प्रक्रियेतील एक मोठा टप्पाच कमी झाल्यामुळे अंतिम निकाल वेळेत लागतील आणि रिक्त पदांवर उमेदवारांना जलद गतीने नियुक्त्या मिळतील. राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीने एमपीएससीचे हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे.


