महाराष्ट्र जागरण डेस्क: आता होऊ दे धिंगाणाच्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ९ ऑगस्टपासून आता होऊ दे धिंगाणाचं चौथं पर्व सुरू होत आहे. एनर्जेटिक सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. चौथ्या पर्वाविषयी सांगताना सिद्धार्थ जाधव म्हणाला, तुमचा कार्यक्रम कधी बंद होणार, यापेक्षा कार्यक्रम कधी सुरू होतोय याची जेव्हा प्रेक्षकांकडून विचारणा होते, तेव्हा तेच त्या कार्यक्रमाचं यश असतं.
मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, इतकं यश आता होऊ दे धिंगाणाला मिळेल. या कार्यक्रमाचा चौथा सीझन करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय. याचं श्रेय स्टार प्रवाह वाहिनी आणि आता होऊ दे धिंगाणाच्या संपूर्ण टीमला जातंय. प्रेक्षकांप्रमाणेच मीसुद्धा या पर्वाची वाट पाहत होतो. नवी ऊर्जा घेऊन हा कार्यक्रम लवकरच भेटीला येतोय. आता होऊ दे धिंगाणा म्हणजे १०० टक्के मनोरंजनाची हमी. नव्या जोशात आणि नव्या ढंगात चौथं पर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. अशा शब्दांत सिद्धार्थ जाधवने आपली भावना व्यक्त केली.


