मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत बाळगून लग्नाच्या उंबरठ्यावर उभा असलेला तरुण नियतीच्या क्रूर खेळाने कायमचा हिरावला गेला. अविनाश उर्फ रोहित प्रकाश क्षीरसागर (वय 27, रा. मंचर) याचा भीषण अपघातात मृत्यू झाला, तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले. ज्या दिवशी त्याच्या लग्नाचा शुभमुहूर्त ठरला, त्याच दिवशी दशक्रिया विधीचा दुर्दैवी प्रसंग क्षीरसागर कुटुंबावर कोसळला.
नेमकं काय घडलं?
15 ऑगस्ट रोजी पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याजवळ रोहित आपल्या आई-वडिलांसह दुचाकीवरून प्रवास करत होता. याचवेळी टेम्पोतील लोखंडी पत्र्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात रोहितचा जागीच मृत्यू झाला. त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताने क्षीरसागर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
लग्नाची स्वप्ने भंगली
नाभिक समाजातील सामान्य कुटुंबातील रोहितचा काही दिवसांपूर्वीच विवाह ठरला होता. लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती, आणि कुटुंबीय आनंदाच्या सोहळ्याची वाट पाहत होते. नातेवाईक आणि मित्रपरिवारही या लग्नाच्या तयारीत सामील झाले होते. 25 ऑगस्ट रोजी लग्नाचा शुभमुहूर्त ठरला होता, पण नियतीने क्रूर खेळ खेळला. मंगलाष्टकांच्या ऐवजी दशक्रिया विधीच्या स्वरांनी मंचर गहिवरले. उपस्थित नातेवाईकांच्या डोळ्यांतून अश्रूंना पूर आला. “रोहित आज आपल्यात असता, तर मंडपात आनंद साजरा झाला असता,” अशा शब्दांत उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. या दुर्दैवी घटनेने मंचर परिसरात शोककळा पसरली आहे.


