Vaibhav Khedekar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) माजी राज्य सरचिटणीस आणि कोकणातील प्रभावी नेते वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. अखेर, खेडेकर यांनी आपला निर्णय जाहीर केला असून, ४ सप्टेंबर २०२५ रोजी ते मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रत्नागिरी-खेड येथील माजी नगराध्यक्ष असलेले खेडेकर हे शेकडो कार्यकर्त्यांसह रविंद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचं कमळ हाती घेणार आहेत.
वैभव खेडेकर यांच्यासह अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव या चार नेत्यांना पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत मनसेने २५ ऑगस्ट २०२५ रोजी बडतर्फ केलं होतं. खेडेकर यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पत्रकार परिषदेत भावूक होताना त्यांनी सांगितलं, “मी ३५ वर्षे राज ठाकरे यांच्यासोबत काम केलं. मनसे वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली, पण गैरसमजातून आणि मला विचार न करता माझी हकालपट्टी झाली. सोशल मीडियावर बडतर्फीचं पत्र वाचलं तेव्हा मन सुन्न झालं.” त्यांनी पक्षासाठी केलेल्या योगदानाचं ‘बडतर्फीचं पत्र’ हेच आपल्या निष्ठेचं प्रमाणपत्र असल्याचंही म्हटलं.
खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी
खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना गेल्या काही महिन्यांपासून जोर आला होता. दापोलीतील महायुतीच्या एका कार्यक्रमात ते भाजप नेत्यांसोबत व्यासपीठावर दिसले होते, जिथे त्यांना पक्षात येण्याचं खुलं आमंत्रण देण्यात आलं होतं. नितेश राणे, शेखर निकम आणि माजी आमदार संजय कदम यांनी खेडेकर यांच्याशी संपर्क साधल्याचंही समोर आलं आहे. खेडेकर यांनी सुरुवातीला भाजप प्रवेश नाकारला होता, परंतु त्यांच्या निकटवर्तीयांनी प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं संकेत दिले होते.
कोकणातील राजकीय समीकरणं
वैभव खेडेकर हे कोकणात, विशेषत: खेड आणि दापोली परिसरात मजबूत जनसंपर्क आणि तरुणांमध्ये लोकप्रियतेसाठी ओळखले जातात. मनसे स्थापनेपासून त्यांनी कोकणात पक्षाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या हकालपट्टीमुळे मनसेला कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, तर भाजपला त्यांच्या प्रवेशामुळे संघटनात्मक बळ मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुढील विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसू शकतो. खेडेकर यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने कोकणातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
खेडेकर यांचा राजकीय प्रवास
वैभव खेडेकर यांनी मनसेत विद्यार्थी सेनेपासून राजकारणाला सुरुवात केली. खेडचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं असून, २०१४ मध्ये दापोली विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. कोकणातील सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, ज्यामुळे त्यांना तरुणांचा लाडका नेता मानलं जातं.


