नवी दिल्ली: ऑनलाईन बेटिंग अॅप प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दोघांनाही नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने उथप्पाला २२ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे, तर युवराज सिंगला २३ सप्टेंबर रोजी समन्स बजावण्यात आले आहे. दोन्ही क्रिकेटपटूंची दिल्लीतील ईडी मुख्यालयात चौकशी केली जाईल.
ईडी उथप्पा आणि युवराजची चौकशी करणार
ऑनलाईन बेटिंग अॅप प्रकरणात या दोन माजी भारतीय क्रिकेटपटूंची चौकशी केली जाईल. युवराज आणि उथप्पा हे एकमेव क्रिकेटपटू नाहीत, ज्यांना या मुद्द्यावर ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी सुरेश रैना आणि शिखर धवन यांनाही या संदर्भात समन्स बजावण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटपटूंची चौकशी करण्याचे हे संपूर्ण प्रकरण बेटिंग अॅप 1xBet शी संबंधित आहे.
अंमलबजावणी संचालनालय गेल्या काही काळापासून ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म्सविरुद्धच्या तपासाला गती देत आहे. या प्रकरणात, ईडीची चौकशी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच पीएमएलए अंतर्गत सुरू आहे.


