पुणे : मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली, तरी महाराष्ट्रात जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज (17 सप्टेंबर) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर पुणे, रायगड, सातारा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.
पावसाची सद्यस्थिती आणि हवामानाचे कारण
विदर्भ आणि परिसरात समुद्र सपाटीपासून 5.8 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण कर्नाटकपासून कोमोरीनपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, ज्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवारी (16 सप्टेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासांत जालना येथे सर्वाधिक 120 मिमी, तर नांदेडमधील हिमायतनगर येथे 110 मिमी पावसाची नोंद झाली. तरीही, अमरावती येथे कमाल तापमान 33.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे राज्यातील उच्चांकी आहे.
येलो अलर्ट, कोणत्या जिल्ह्यांत सतर्कता?
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट): रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड.
विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट): रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर.
उर्वरित राज्य: हलक्या सरींची शक्यता.
मॉन्सूनची माघार सुरू
हवामान विभागानुसार, नैऋत्य मॉन्सूनने 14 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला आहे. 16 सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनने राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून माघार घेतली. मॉन्सूनची परतीची सीमा सध्या भटिंडा, फतेहबाद, पिलानी, अजमेर, दिसा, भूजपर्यंत आहे.


