Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणाऱ्या प्रचंड खर्चावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी दावा केला की, निवडणूक लढण्यासाठी 2-3 कोटी रुपये आणि कधी कधी 100 बोकडसुद्धा खर्चावे लागतात. या वक्तव्यावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडल्यानंतर गायकवाड यांनी खुलासा करताना म्हटलं, “वडेट्टीवार, वैभव नाईक आणि मुंबईच्या महापौर बाईंनी जास्त चाभरेपणा करू नये. मी तुमच्या पक्षाबद्दल बोलत होतो, माझ्या नाही!”
गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांच्यावरही गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “गेल्या विधानसभा निवडणुकीत शेळके यांनी तब्बल 70 कोटी रुपये खर्च केले.” तसेच, शरद पवार यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांनी बुलढाणा तालुक्यातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचा दावाही त्यांनी केला.
काय म्हणाले होते संजय गायकवाड?
डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी महायुतीच्या एकजुटीवर भर दिला. ते म्हणाले, “आम्हाला शिवसेना-भाजप युती हवी आहे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. विधानसभा, लोकसभेला युती करायची आणि छोट्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं का? त्यांनी पैसे खर्च करून मातीत जायचं आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.


