बंगळुरू: कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कापूनसुद्धा ती रक्कम त्यांच्या पीएफ खात्यात जमा केली नसल्याच्या प्रकरणात माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाविरोधात शनिवारी अटक वॉरंट जारी करण्यात आले. हे वॉरंट क्षेत्रीय पीएफ आयुक्तांनी जारी केले असून पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उथप्पावर एकूण २३ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
बंगळुरूच्या क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी ४ डिसेंबर रोजी हे वॉरंट जारी केले होते; परंतु उथप्पा हा बंगळुरूमधील त्याच्या घरी त्यावेळी नव्हता. रॉबिन उथप्पा ‘सेंच्युरीज लाइफस्टाइल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या सेवेत असताना त्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कापूनसुद्धा ती रक्कम त्यांच्या पीएफ खात्यात जमा केली नाही, असा त्याच्यावर आरोप आहे.


