मुंबई: विजय हजारे करंडक २०२४-२५ स्पर्धेच्या ‘ब’ गटातील एका सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानवर तीन विकेट्स आणि ४५ चेंडू राखून मात केली. ९५ चेंडूंत नाबाद ७४ धावा फटकवणारा अंकित बावणे हा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरला. महाराष्ट्राने विजयासाठीचे २१६ धावांचे लक्ष्य ४२.३ षटकांत ७ विकेट्सच्या मोबदल्यात साध्य केले.
विजयी लक्ष्य साकारताना अंकितला निखिल नाईक (५६ चेंडूंत ४६) आणि सिद्धेश वीर (५० चेंडूंत ४३) यांनी शानदार साथ दिली. राजस्थानच्या अनिकेत चौधरीने ४९ धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स मिळवल्या. त्याआधी, नाणेफे क गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने कार्तिक शर्माच्या शानदार शतकाच्या (९० चेंडूंत १२३) जोरावर ४०.१ घटकांत २१५ धावा केल्या. महाराष्ट्राच्या रजनीश गुरबाणीने ३५ धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स मिळवल्या. कार्तिक शर्मा वगळता अन्य फलंदाज महाराष्ट्राच्या प्रभावी गोलंदाजीपुढे तग धरू शकले नाहीत..


