छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा हा पारंपरिक दुष्काळग्रस्त प्रदेश असा ओळखला जातो, पण सध्या मात्र अतिवृष्टीने येथे प्रलयकारी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून झालेल्या मुसळधार पावसाने जीवितहानी, पशुधनाचे नुकसान आणि मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. एकूण ८ जणांचा मृत्यू झाला असून, ११,५०० हून अधिक लोकांना पूरग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, जालना, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) रेड अलर्ट जारी केला असून, पावसाचा जोर ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (२८ सप्टेंबर) मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मदतकार्याचा आढावा घेतला आणि क्षेत्रीय पातळीवर प्रयत्न वाढवण्याचे निर्देश दिले.
८ मृत्यू,अनेक जखमी; धाराशिवमध्ये सर्वाधिक फटका
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मराठवाड्यात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यात ३, नांदेडमध्ये १, बीडमध्ये १, लातूरमध्ये १ आणि इतर जिल्ह्यांत २ असे मृत्यू समोर आले आहेत. धाराशिवमध्ये परंडा तालुक्यातील पूरात वाहून जाणाऱ्यांचा समावेश आहे, तर नांदेडमध्ये वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जखमींमध्ये धाराशिवमध्ये ५ आणि बीडमध्ये १ अशी स्थिती आहे. १८९ महसूल वर्तुळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, छत्रपती संभाजीनगरमधील हर्षुल (१९६ मिमी) आणि वैजापूरमधील शिवूर-बोरसर (१८९ मिमी) हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले.
पशुधनाचे नुकसान, जनावरे दगावली
पावसामुळे पशुधनालाही मोठा धक्का बसला आहे. एकूण २१३ हून अधिक जनावरे मृत्यू पावली असून, यामध्ये धाराशिवमध्ये ८१, जालनामध्ये ४०, छत्रपती संभाजीनगरमध्ये १२, बीडमध्ये काही आणि इतर जिल्ह्यांत उर्वरित समाविष्ट आहेत. दुधाळ जनावरांपैकी ९८ मोठी आणि ८६ लहान, तर ओढकाम करणारी २५ मोठी आणि ७ लहान जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांसाठी हे नुकसान अत्यंत वेदनादायक आहे, कारण मराठवाड्यात ९०% शेती पावसावर अवलंबून आहे.
७० लाख हेक्टर पिकांचे नुकसान
अतिवृष्टीने खाजगी मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. एकूण ८९२ घरांची पडझड झाली असून, यामध्ये धाराशिवमध्ये ६११, लातूरमध्ये ८९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७३, नांदेडमध्ये ५६, परभणीत ४२ आणि जालनामध्ये २१ घरांचा समावेश आहे. याशिवाय, ७० लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून, धाराशिवमध्ये ३३,००० हेक्टर पिके उद्ध्वस्त झाली आहेत. १५९ गावे पूर्णपणे प्रभावित झाली असून, हेलिकॉप्टर आणि बोटींद्वारे मदतकार्य सुरू आहे.
९ पूल, ४ रस्ते वाहून गेले; ८ शाळा उद्ध्वस्त
सार्वजनिक मालमत्तेलाही फटका बसला आहे. मराठवाड्यात ९ पूल वाहून गेले असून, यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे ४, बीडचे ४ आणि परभणीत १ समाविष्ट आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ रस्ते वाहून गेले, तर धाराशिवमध्ये ६ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये २ शाळांचे नुकसान झाले आहे. तसेच, ५ लहान धरणे पूराने उध्वस्त झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक खंडित झाली असून, एनडीआरएफ आणि सेनेच्या पथकांना सतर्क करण्यात आले आहे.


