Vaishnavi Hagawane Murder Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे. वैष्णवीच्या सासू, नणंद आणि पतीच्या मित्राने दाखल केलेला जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करत कोर्टाने तिघांना जामीन नाकारला.
काय आहे नेमकं प्रकरण?
वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. तपासादरम्यान हगवणे कुटुंबीयांचे राजकीय संबंध, पोलिसांवरील प्रभाव आणि कौटुंबिक हिंसाचाराची पार्श्वभूमीही समोर आली. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा सुशील हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि पतीचा मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली होती.
लग्नात21 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि कार्यालयात नोकरी देण्याचे मान्य करूनही वैष्णवीला लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून छळाला सामोरे जावे लागले. चार-पाच महिन्यांत पुन्हा चांदीच्या भांड्यांची मागणी करण्यात आली. इतकेच नव्हे तर गर्भवती असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केल्याचाही आरोप तिच्या पालकांनी केला आहे.
कोर्टाने सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, नऊ महिन्यांच्या बाळाची आई दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक आहे. आरोपींवर आत्महत्येला प्रवृत्त करणे, कट कारस्थान रचणे, पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना लपवण्याचे गंभीर आरोप आहेत. म्हणूनच आरोपींना जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो किंवा पुरावे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपी तुरुंगातच राहणार आहेत.


