मुंबई : ‘इंडियन आयडल’ हा टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक शो आहे. पण, आता संगीत प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, ‘इंडियन आयडल’च्या १६ व्या सीझनचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. तो लवकरच ‘प्लेलिस्ट ऑफ मेमरीज’ या नवीन थीमसह टीव्हीवर परतणार आहे.
इंडियन आयडलचा नवीन सीझन १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रीमियर होईल. तो सोनी लिव्हवर स्ट्रीमिंगसाठी देखील उपलब्ध असेल. निर्मात्यांनी नवीन प्रोमो रिलीज केला आहे. यावेळी निर्मात्यांनी इंडियन आयडलसाठी ‘प्लेलिस्ट ऑफ मेमरीज’ ही थीम निवडली आहे. शो जुन्या गाण्यांना वर्तमानाशी जोडण्यावर लक्ष केंद्रित करेल. हा सीझन भावना, आठवणी आणि अविश्वसनीय प्रतिभेचा एक मनमोहक प्रवास असणार आहे.
सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या इन्स्टाग्राम हँडलने पोस्ट शेअर केली आहे. त्यात १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता इंडियन आयडल पाहा. आठवणींची प्लेलिस्ट, इंडियन आयडलचा एक नवीन सीझन येत आहे, असे म्हटले आहे.
श्रेया घोषालसह रॅपर बादशाहही असणार
संगीत क्षेत्रातील तीन प्रसिद्ध नावे परीक्षकांच्या यादीत सामील होत आहेत. विशाल दादलानी, श्रेया घोषाल आणि रॅपर बादशाह हे त्यांच्यामध्ये असतील. ते स्पर्धकांना मार्गदर्शन करतील आणि जुनी गाणी नव्या पद्धतीने आणतील.


