मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. मंगळवारी (१४ ऑक्टोबर) शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शरद पवार गटाचे जयंत पाटील, अजित नवले आणि प्रकाश रेड्डी यांसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली.
मात्र, मंगळवारीची चर्चा अपूर्ण राहिल्याने आज (१५ ऑक्टोबर) पुन्हा ठाकरे बंधूंसह मविआचे नेते निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. यावेळी मात्र शरद पवार उपस्थित राहणार नाहीत.
शरद पवार यांच्या अनुपस्थितीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना आज पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. ते पुण्याला रवाना होणार असून, त्यामुळे मविआ शिष्टमंडळासोबत ते निवडणूक आयोगाच्या बैठकीस हजेरी लावू शकणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे मात्र उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी झालेल्या बैठकीत मतदारयादीतील घोळ, जुलै १, २०२५ ही कट-ऑफ डेट नसावी अशा मागण्या मांडण्यात आल्या होत्या. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिले की, स्थानिक निवडणुकीसाठी विधानसभा मतदारयादी वापरली जाईल आणि आयुक्तांकडून कोणतेही बदल केले जात नाहीत.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीत सक्रिय सहभाग घेतला. आयुक्त चोक्कलिंगम यांनी मागण्या ऐकून घेतल्या, पण काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले. विरोधकांनी सांगितले की, लोकशाही बळकट करण्यासाठी आणि स्थानिक निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी ही चर्चा आवश्यक आहे.


