11th Admission: अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता शेवटची संधी आहे. राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुदत वाढवून दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीतील निर्देश यांचा विचार करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे. 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याती नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. 4 ऑक्टोबर सकाळी 10 ते 6 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणीसह प्राधान्यक्रम भरणे, तसेच प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे. या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची व नोंदणीची सुविधा अंतिमतः देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या फेरीमध्ये विकल्प भरले आहेत त्यांच्या प्राधान्यक्रम / विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास केवळ अशा विद्यार्थ्यांना पुनश्चः रिक्त जागा दर्शवून रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन विकल्पात बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.
या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणानुक्रमे देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी विकल्प नोंदविला नाही त्यांना त्या स्तरावर गुणानुक्रमे महाविद्यालयाची अलॉटमेंट करण्यात येणार नाही. तदनंतरही गुणानुक्रमे कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना पुनःश्च विकल्प नोंदविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणानुक्रमे देण्यात येईल.
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ही अंतिम फेरी असून यानंतर संधी मिळणार नाही. अधिक माहितीसाठी मंडळाचे अधिकृत पोर्टल-https://mahafyjcadmissions.in ला भेट द्यावी अथवा ई-मेल आयडी- support@mahafyjcadmissions.in किंवा हेल्पलाईन नंबर 8530955564 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.


