Kolhapur Crime : कोल्हापूर-मुंबई महामार्गावर आराम बस अडवून सव्वा कोटींचा मुद्देमाल लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने टाकलेला हा दरोडा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला असून, सर्व ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
कोयत्याच्या धाकावर सव्वा कोटींची लूट
ही घटना २२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेली आराम बस सांगली जिल्ह्याच्या सीमेवर आली असता, सात दरोडेखोरांनी ती अडवली. दरोडेखोरांनी बसच्या क्लिनरच्या गळ्याला कोयता लावून चालकाला मारहाण केली. बसमधील पार्सल विभागात असलेले सोने, चांदीचे दागिने आणि मोबाईलचे महागडे स्पेअर पार्ट्स असा एकूण १ कोटी २२ लाखांचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले होते.
सीसीटीव्ही आणि खबऱ्यांचे जाळे
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी मुख्य सूत्रधार अक्षय कदम (रा. विक्रमनगर, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या सहा साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
हेही वाचा – Dhule Crime : चोरीच्या संशयावरुन चिमुकल्याला बैलगाडीला बांधून खालून जाळ लावला, महाराष्ट्र हळहळला
नियोजनबद्ध केलेला कट उधळला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अनेक दिवसांपासून या बसचा पाठलाग करून रेकी केली होती. पार्सल कधी आणि कुठे असते, याची त्यांना पक्की माहिती होती. मात्र, पोलिसांनी जलद गतीने हालचाली करत सर्व ७ आरोपींना अटक केली आणि लुटलेला संपूर्ण १ कोटी २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांचे सर्वत्र कौतुक
इतक्या मोठ्या रक्कमेचा आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा अवघ्या अर्ध्या दिवसात उघडकीस आणल्याबद्दल कोल्हापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि एलसीबीच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सध्या सर्व आरोपी वडगाव पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरू आहे.


