Delhi Suicide Case: दिल्लीतील वसंत विहार परिसरात कमला पसंद आणि राजश्री पान मसाला ग्रुपचे मालक कमल किशोर यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव दीप्ती चौरसिया (वय 40) असून तिचा मृतदेह घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दीप्ती चौरसिया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
सुसाईड नोटमध्ये कोणावरही आरोप नाही
पोलीस तपासानुसार, घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली आहे. या चिठ्ठीत दीप्तीने कोणत्याही व्यक्तीवर थेट आरोप केलेले नाहीत. चिठ्ठीत तिची मानसिक आणि भावनिक स्थिती व्यक्त केली असल्याचे प्राथमिक समजते. कोणत्याही प्रकारच्या छळाचा किंवा वादाचा उल्लेख नाही. दीप्तीने २०१० मध्ये अर्पित चौरसिया, कमल किशोर यांचा मुलगा, याच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. कुटुंब सध्या दिल्लीत राहत असून दीप्तीचा जन्म व माहेर बिहारमधील एक राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला आहे. तिचे वडील एकेकाळी प्रभावशाली राजकीय नेते होते.
हेही वाचा – गौरी पालवे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! गौरीच्या वडिलांकडून ‘या’ दोन व्यक्तींच्या अटकेची मागणी
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सध्या घरगुती वाद किंवा छळाचे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. तरीही पोलिस सर्व शक्य कोनातून तपास करत आहेत. दीप्ती आणि तिचा पती अर्पित यांचे नातेसंबंध, अलीकडील घडामोडी, फोन रेकॉर्ड आणि वैयक्तिक संभाषणांशी संबंधित डिजिटल डेटा तपासला जाईल. कुटुंबातील दोन्ही बाजूंचे जबाब देखील नोंदवले जात आहेत.
पोस्टमॉर्टम व फॉरेन्सिक रिपोर्ट महत्वाचा ठरणार
पोस्टमॉर्टम अहवालानुसार मृत्यूचा नेमका प्रकार व परिस्थिती स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असून ती दीप्तीचीच आहे का, याचीही पुष्टी केली जाणार आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.


