Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील गुमगाव (ता. हिंगणा) येथे बुधवारी सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. जुन्या घरगुती वादाचा वचपा काढण्यासाठी एका माथेफिरूने भरवस्तीत अंदाधुंद गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात एका प्राध्यापकासह तीन जण गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
सकाळच्या शांततेत गोळीबाराचा आवाज
प्राप्त माहितीनुसार, गुमगाव येथील रहिवासी गज्जू नावाच्या व्यक्तीचे स्थानिक देवतळे कुटुंबासोबत गेल्या काही काळापासून घरगुती वाद सुरू होते. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात असलेल्या आरोपी गज्जूने अचानक बंदूक काढून देवतळे कुटुंबीयांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. दोन राऊंड झालेल्या या फायरिंगमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा – Sagar Dhanore Death : काँग्रेस नेत्याच्या पुतण्याची कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या; जालन्यात खळबळ
प्राध्यापकासह मित्रही रक्ताच्या थारोळ्यात
आरोपीने केलेल्या या गोळीबारात नितीन देवतळे (प्राध्यापक), प्रविण देवतळे, त्यांच्यासोबत असलेला एक मित्र जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजते. ऐन सकाळी आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून शस्त्राचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. किरकोळ वादाचे पर्यावसान थेट गोळीबारात कसे झाले आणि मुख्य म्हणजे आरोपीकडे परवाना नसलेली बंदूक आली कुठून? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या रडारवर असून, या घटनेमुळे ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


