Nashik Crime News: नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आज पहाटे एका तरुणाचा देवदर्शनाला जाताना खून झाल्याची घटना ताजी असतानाच, काही तासांच्या आत शहरात आणखी एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातपूर परिसरात एका तरुणाने स्वतःच्या आईवर चाकूने वार करून तिचा खून केला. मंगला घोलप (वय 45) असं या महिलेचं नाव आहे. त्या सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला घोलप यांचा मुलगा स्वप्नील घोलपने आईवर धारदार शस्त्राने वार केले. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. दरम्यान, घोलप यांच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सातपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार, या घटनेमागील कौटुंबिक वादाची शक्यता तपासली जात आहे. नाशिकमध्ये अवघ्या काही तासांत दोन खुनाच्या घटना घडल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांत नाशिक आणि परिसरात खुनाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
गेल्या नऊ महिन्यांतील ही 45 वी हत्या असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीत नमूद आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासन आता या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश कसा आणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


