Farmer Income Tax: राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना, नाशिकच्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपली आर्थिक ताकद दाखवून दिली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजवला असतानाही नाशिकच्या शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा कर भरणा करून शेतकरी कर भरत नाहीत या टीकेला ठोस प्रत्युत्तर दिलं आहे.
नाशिकमधील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या सह्याद्री फार्म्स या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 1,955 कोटी रुपयांची उलाढाल केली. या कंपनीने 85.5 कोटी रुपयांचा कर भरला असून, त्यापैकी 54 कोटी रुपयांचा आयकर सरकारी तिजोरीत जमा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर कंपनीने 99.7 कोटी रुपयांचा नफा मिळवून राज्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक शिस्तीचं आणि प्रगतीचं मोठं उदाहरण ठेवले आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! पूरग्रस्तांसाठी सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर; शेतकऱ्यांना काय-काय मिळणार?
शेतकऱ्यांचा एकूण करभरणा
आतापर्यंत शेतकऱ्यांनी विविध करांद्वारे 218.4 कोटी रुपये सरकारकडे भरले आहेत. खत, औषधे, शेतीतील उपकरणे यांवरील GST देखील शेतकरी प्रामाणिकपणे भरत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी एकरी सरासरी 36 हजार रुपयांचा कर भरतात. राज्यभरातील द्राक्ष उत्पादकांकडून 1,300 ते 1,400 कोटी रुपयांपर्यंतचा कर सरकारी तिजोरीत जमा होत असल्याचा अंदाज आहे.
अतिवृष्टीचा तडाखा आणि सरकारी मदतीची अपेक्षा
दुसरीकडे, राज्यात सततच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचं उत्पादन जवळपास 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावलं उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कृषि तज्ज्ञांच्या मते, सरकारने शेतीला ‘कृषि उद्योग’ म्हणून वागणूक देत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आजच्या आर्थिक आव्हानांमध्येही नाशिकचा शेतकरी कर भरण्याइतका सक्षम आहे, हे राज्याच्या कृषि अर्थव्यवस्थेला नवीन दिशा देणारे उदाहरण ठरले आहे.


