Pune Crime: पुण्यातील कुख्यात गुंड आंदेकर टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक पावले उचलली आहेत. आंदेकर टोळीविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल झाले असतानाच आता काही तरुणांनी आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीच्या समर्थकांनी सोशल मिडिया अकाउंट वर आंदेकर समर्थनार्थ “बदला तो फिक्स, रिप्लाय होगा. आता फक्त बॉडी मोजा…” अशा व इतर स्टेटस स्टोरी अपलोड केल्या होत्या. असे रिल्स अपलोड करुन गुन्हेगारीस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढली आहे.
मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पियुष बिडकर, अथर्व नलावडे आणि ओंकार मेरगु असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत समर्थ पोलीस ठाण्यात आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
आयुष कोमकर प्रकरणात आणि इतर काही गुन्ह्यांत बंडू आंदेकरसह २० जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान नव्या तक्रारी व पुरावे समोर आल्यानंतर समर्थ पोलिसांनी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत. आता टोळीच्या समर्थनार्थ रिल्स बनविणाऱ्या आरोपींना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे.


