Pune Crime News: सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकून आपल्या आयुष्याची जमापुंजी गमावलेल्या एका ज्येष्ठ दाम्पत्याला पुणे न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली लुटले गेलेले साडेदहा लाख रुपये तातडीने परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, यामुळे कॅन्सरशी झुंज देणाऱ्या पत्नीच्या उपचाराचा प्रश्न सुटला आहे.
नेमकी घटना काय होती?
कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्धाला आणि त्यांच्या ६५ वर्षीय पत्नीला सप्टेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले होते. ‘तुमचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आले आहे,’ अशी भीती दाखवून चोरट्यांनी या दाम्पत्याला तासनतास डिजिटल कोठडीत (Digital Arrest) ठेवले. अटकेच्या भीतीने या दाम्पत्याने तब्बल १९ लाख ६० हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वळवले होते.
न्यायालयाने का दिला हा दिलासा?
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने पोलिसांत धाव घेतली. सायबर सेलने तातडीने कारवाई करत संबंधित बँक खात्यांमधील रक्कम गोठवली. मात्र, ही रक्कम कायदेशीर प्रक्रियेत अडकल्याने दाम्पत्याची मोठी अडचण झाली होती. पती निवृत्त असून पत्नीला कॅन्सरचा गंभीर आजार आहे. खाती गोठवल्यामुळे औषधोपचारासाठी पैसे नसल्याने हे दाम्पत्य हवालदिल झाले होते. ॲड. धवल दहिदुले यांच्यामार्फत या दाम्पत्याने लष्कर न्यायालयात पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज केला.
न्यायालयाचा निर्णय आणि अटी
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी या प्रकरणातील मानवी बाजू लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय दिला. १० लाख ५० हजार रुपयांची रक्कम ज्येष्ठ दाम्पत्याला परत करण्याचे आदेश देताना न्यायालयाने काही अटी घातल्या. आयुष्यभराची कमाई एका क्षणात गमावल्यानंतर ओढवलेल्या अंधकारात न्यायालयाच्या या निर्णयाने प्रकाशाचा किरण दाखवला आहे. आपल्या हक्काचे पैसे परत मिळाल्याने या दाम्पत्याने सुटकेचा निःश्वास टाकला असून आता पत्नीवर योग्य उपचार करणे शक्य होणार आहे.


