मुंबई : सध्या इराण-अमेरिका संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर याचा परिणाम होताना दिसत आहे. त्यात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात असा दावा केला जात आहे की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पेट्रोलच्या दरात ₹10 आणि डिझेलच्या दरात ₹12.50 ची वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पीआयबीच्या (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) फॅक्ट चेकने हे दावे फेटाळून लावले आहेत.
पीआयबीने स्पष्टपणे सांगितले आहे की, ही खोटी बातमी आहे आणि सरकारने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. पीआयबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अशा पडताळणी न केलेल्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर शेअर करू नयेत. अधिकृत सूत्रांनुसार, येत्या काळात घरगुती एलपीजी सिलिंडर प्रति सिलिंडर ₹40-50 ने महाग होऊ शकतात. जवळपास चार वर्षांतील इंधनाच्या दरातील ही पहिली मोठी दरवाढ असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अलीकडे प्रति बॅरल सुमारे $120-126 पर्यंत वाढल्या आहेत आणि $100 च्या वर आहेत.
दरम्यान, भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए), व्ही. अनंत नागेश्वरन यांनी इशारा दिला आहे की, सामान्यपेक्षा कमी मान्सून आणि वाढत्या ऊर्जा किमती यांच्या एकत्रित परिणामामुळे येत्या काही महिन्यांत महागाईत अचानक वाढ होऊ शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच त्रस्त असलेल्या कुटुंबांसाठी हा दुहेरी फटका असेल.


