मुंबई : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. त्यातच, अमेरिकन फेडरल रिझर्व्हने एक मोठा निर्णय घेतला. या वर्षी सलग दुसऱ्यांदा पॉलिसी रेट कपातीची घोषणा केली. त्यानंतर आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून आली, तर निफ्टी देखील ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होता.
भारतीय बाजाराची सुरुवातही चांगली होईल अशी अपेक्षा जास्त होती. मात्र, असे न होताच त्याच्या विरुद्ध घडल्याचे पाहिला मिळाले. गुरुवारी, आठवड्याच्या चौथ्या दिवशी, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले. रिलायन्स आणि एअरटेलपासून टाटा स्टीलपर्यंतच्या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. शेअर बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला, बीएसई सेन्सेक्स ८४७५०.९० वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ८४९९७.१३ पेक्षा कमी होता. मात्र, अचानक ४५० अंकांनी घसरून ८४५४७ वर व्यवहार करत होता.
दुसरीकडे, एनएसई निफ्टी देखील सेन्सेक्सच्या बरोबरीने पुढे जात असल्याचे दिसून आले. निर्देशांक २५९८४ वर व्यवहार सुरू झाला, जो त्याच्या मागील बंद २६०५३.९० च्या तुलनेत किंचित घसरण होता आणि नंतर १४० अंकांनी घसरून २५९१० वर व्यवहार करत होता.
शेअर बाजारातील घसरणीमुळे बीएसईच्या ३० पैकी २९ लार्जकॅप शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते. सनफार्मा (१.६२%), भारती एअरटेल (१.४०%) आणि टाटा स्टील (१.१०%) घसरले. तर मुकेश अंबानी यांचा रिलायन्स शेअर देखील लाल रंगात व्यवहार करत होता.


