मुंबई : सुपरस्टार नागार्जुन रजनीकांतच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ चित्रपटात सायमनच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटातील त्याच्या नकारात्मक भूमिकेसाठी नागार्जुनचे खूपच कौतुक झाले. प्रेक्षकांना त्याची भूमिकाही खूप आवडली आहे. आता ‘कुली’ चित्रपटगृहात प्रदर्शित होताच नागार्जुनने त्याच्या पुढच्या चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती शेअर केली आहे. हा त्याचा 100 वा चित्रपट देखील असणार आहे.
नागार्जुन याने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करताच त्याचे चाहते त्याला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. नागार्जुनने त्याच्या 100 व्या चित्रपटाची घोषणा केली आणि त्याबद्दल त्याने माहिती दिली. नागार्जुनने सांगितले की, त्याचा 100 वा चित्रपट तमिळ दिग्दर्शक कार्तिक दिग्दर्शित करेल, ज्याचे शीर्षक सध्या ‘किंग 100’ आहे. चित्रपटाची तयारी गेल्या 6-7 महिन्यांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे.
याबाबत नागार्जुन याने सांगितले की, ‘माझा पुढचा चित्रपट ‘किंग १००’ असेल. गेल्या ६-७ महिन्यांपासून त्याची तयारी सुरू आहे. तमिळ दिग्दर्शक कार्तिकने मला एक वर्षापूर्वी त्याची पटकथा सांगितली. हा एक उत्तम चित्रपट आहे आणि आम्ही ‘कुली’ नंतर त्याचे शूटिंग सुरू करू. हा एक अॅक्शन-पॅक्ड फॅमिली ड्रामा चित्रपट आहे.
‘कुली’मध्ये नागार्जुन खलनायकाची भूमिका साकारत आहे. तर मागील चित्रपट ‘कुबेर’मध्येही तो सुरुवातीला खलनायकाचा साथीदार आहे. नंतर त्याचे पात्र सुधारत असल्याचे दिसून आले. आता त्याच्या १०० व्या चित्रपटाबद्दल नागार्जुन म्हणाला की, यावेळी मी चित्रपटात नायक आहे. नागार्जुनने अशाप्रकारे चित्रपटात नायकाची भूमिका साकारणार असल्याचे म्हणातच चाहते आता त्याच्या प्रतिक्षेत आहेत.


